हडपसरमध्ये कोयता गँगची दहशत ; सुरक्षा रक्षकावर कोयत्याने वार, ११ वाहनांची तोडफोड

पुणे – हडपसर भागात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. या टोळीने हांडेवाडी रस्त्यावरील चिंतामणीनगर येथील भाजी मार्केटमध्ये एका सुरक्षा रक्षकावर कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यानंतर पळून जाताना आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या १० कार आणि १ बसची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण केली.
आकाश लक्ष्मण कोठावळे (वय २९, रा. गाडीतळ, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून हल्ला करणाऱ्यांपैकी अंजू उर्फ महमंद हुसेन शब्बीर शेख आणि अविनाश सतीश केकाणे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. जखमी आकाशचे वडील लक्ष्मण बाबुराव कोठावळे (वय ५७) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १४) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षक आकाश कोठावळे याचा आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठलाग केला आणि त्यांच्यावर कोयत्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळलेल्या आकाशाला तेथील स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या संपूर्ण हल्ल्याचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सुरक्षक्षकावर हल्ला केल्यानंतर तिथून पसार होत असतानाही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी जेएसपीएम कॉलेजच्या शेजारील आदर्शनगर परिसरातील रस्त्यावर उभ्या केलेल्या १० कार आणि १ बसची कोयत्याने तोडफोड करत गाड्यांचे मोठे नुकसान केले. इतर आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करत आहेत.






