पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू ; सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघाले असताना काळाची झडप

पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू ; सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघाले असताना काळाची झडप
Share

गोकाक- सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या पुण्यातील एकाच कुटुंबावर काळाचा घाला पडला. भरधाव ट्रकने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत ४ वर्षाच्या मुलासहित तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात जत-जांबोटी राज्य महामार्गावर गोकाकपासून सहा किलोमीटर अंतरावरील दुंडानट्टी गावाजवळ रविवारी (ता. १५) सकाळी साडेआठच्या सुमारास झाला.

ओंकार चंद्रशेखर मांढरे (वय २८), रेश्मा श्रीकांत मांढरे (३२) आणि देवांश श्रीकांत मांढरे (४, तिघेही रा. नऱ्हे-आंबेगाव, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. वंदना चंद्रशेखर मांढरे (५६), श्रीकांत चंद्रशेखर मांढरे (३४) आणि हर्षदा ओंकार मांढरे (२६) हे जखमी झाले असून, यातील हर्षदा यांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना गोकाक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांढरे कुटुंबीय शनिवारी पुण्याहून निघाले होते. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी संकेश्वर येथे नातेवाईक सारिका दीपक काकडे यांच्या घरी चहा-नाश्ता केला. त्यानंतर सकाळी साडेसहाच्या सुमारास ते सौंदत्तीकडे रवाना झाले. सकाळी साडेआठच्या सुमारास दुंडानट्टी गावाजवळ गोकाकच्या दिशेने कापसाच्या बियाण्यांनी भरलेला ट्रक (केए २४, ६३८७) भरधाव वेगाने येत होता. पुढे चाललेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले व ट्रकने समोरून येणाऱ्या मोटारीला धडक दिली. धडकेनंतर ट्रक रस्त्यावर उलटला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मोटारीतील चालक ओंकार, त्यांची भावजय रेश्मा आणि पुतण्या देवांश यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. घटनेची नोंद गोकाक ग्रामीण ठाण्यात झाली आहे. उपअधीक्षक रवी नायक आणि पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. बी. वालीकर पुढील तपास करीत आहेत.

Vedh News