नवी मुंबईत सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर धाडसी दरोडा; २० कोटींचे सोने लूटले

नवी मुंबईत सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर धाडसी दरोडा; २० कोटींचे सोने लूटले
Share

नवी मुंबई – सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर धाडसी दरोडा टाकून तब्बल २० कोटी रुपयांचे सोने लुटून नेले. ही धक्कादायक घटना नवी मुंबई मधील जुई नगर एम आय डी सी परिसरात गुरुवारी (दि.२६) रोजी रात्री ९:४५ च्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चेन अँड चेन्स ज्वेल्स लिमिटेड’ या कंपनीचे कर्मचारी मुंबईतील झवेरी बाजार येथील दुकानातून नेरूळ एमआयडीसीतील कारखान्याकडे एका व्हॅनमधून सोन्याच्या विटा घेऊन जात होते. सायन-पनवेल महामार्गालगतच्या जुईनगर स्थानकाजवळील सर्व्हिस रोडवर व्हॅन आली असता

समोरून आलेल्या एका हॅचबॅक (वॅगनआर) कारने सोन्याचे वाहन अडवले. कारमधून उतरलेल्या चार दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने वाहनाची पुढील आणि बाजूची काच फोडली. त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून चालकाच्या शेजारी बसलेल्या कर्मचाऱ्याकडील सोन्याची बॅग हिसकावून पळ काढला.

या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तुर्भे पोलिसांची चार पथके आणि नवी मुंबई गुन्हे शाखेची समांतर पथके कार्यरत आहेत. पोलिसांनी संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

Vedh News