लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सुमारे ८० आगीच्या घटना, अग्निशमन दलाची धावपळ
पिंपरी- दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या ८० घटनांची नोंद झाली. आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलाची मात्र दिवसभर धावपळ उडाली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरांना आणि फ्लॅटला आग लागण्याच्या २० घटना घडल्या. मोकळ्या मैदानातील गवत, कचरा आणि झाडांना आग लागण्याच्या २५ घटना नोंदवण्यात आल्या. तर फ्लेक्स, कंपाउंड आणि टॉवरला आग लागण्याच्या पाच घटनांचा समावेश आहे. सुदैवाने कोणत्याही घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र नागरिकांनी फटाके वाजवताना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुणे शहरात ३० विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. पुण्यात कोंढवा येथील कडनगर चौकातील पडीक इमारतीच्या बेसमेंटमधील साहित्याला आग लागली. धायरीतील डीएसके विश्व परिसरातील मोकळ्या मैदानातील गवत, शिवाजीनगरमधील शिरोळे रस्त्यावरील झाड आणि काशेवाडीतील हरकानगर परिसरातील कचऱ्याने पेट घेतला. संध्याकाळी सदाशिव पेठेतील नागनाथ पार, वडगाव बुद्रुक, कात्रज, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोथरूड, नाना पेठ, भवानी पेठ, खराडी, टिंगरेनगर, शुक्रवार पेठ, गंज पेठ, पाषाण आणि वारजे परिसरात आगीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी इमारतींच्या गॅलरी आणि फ्लॅटमध्ये, तर काही ठिकाणी झाडे आणि मोकळ्या जागेतील गवताला आग लागली.
सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड चित्रपटगृहाजवळ सोनावणे इंडस्ट्रीज येथील फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला रात्री नऊच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच जवानांकडून आग विझविण्यात आली.
