चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची फरासखाना पोलिसांसोबत विमानाची सफर…काय आहे प्रकार ?

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची फरासखाना पोलिसांसोबत विमानाची सफर…काय आहे प्रकार ?
Share

पुणे- चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे करून कोलकाता येथे पळून गेलेल्या दोन आरोपींना फरासखाना पोलिसांनी पकडले. मात्र तिथून आरोपीना पोलिसांनी विमानाने पुण्यात आणले. या प्रकाराची पोलीस वर्तुळात चर्चा सुरू झाली असून आरोपींना विमानाने का आणले ? या प्रवासाचा खर्च कोणी केला असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रबंजन शांती डोलाई आणि लालन मंडल अशी या दोन आरोपीना विमानाने पुण्यात आणण्यात आले.

याबाबतची माहिती अशी की, गणेश पेठेतील सराफी दुकानातून १७ किलो चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा असा ४० लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या दुकानात कारागीर म्हणून काम करणाऱ्या लालन मंडल याच्यावर चोरीचा संशय होता. दुकानमालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, लालन मोठी बॅग घेऊन पहाटेच्या सुमारास दुकानातून बाहेर पडताना दिसला होता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत पुणे शहरातील रविवार पेठेतील सराफी व्यावसायिकाने दागिने तयार करण्यासाठी प्रबंजन शांती डोलाई याच्याकडे एक हजार ८५० ग्रॅम शुद्ध सोने दिले होते. मात्र, दागिने तयार करून न देता आणि सोनेही परत न करता त्याने सुमारे दोन कोटी ५९ लाख रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी डोलाई आणि त्याच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपी कोलकाता येथे पळून गेले होते. आरोपी कोलकाता येथे असल्याची माहिती मिळाल्यावर एका सहायक पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांचे पथक त्यांना पकडण्यासाठी रवाना झाले. पथकाने दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींना रेल्वेने घेऊन येण्याऐवजी विमानाने पुण्यात आणल्याबाबत पोलीस वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. परराज्यातून आरोपींना अटक करून घेऊन येताना प्रवासाबाबत कोणते नियम आहेत ? या नियमाचे पालन झाले का , या विमान प्रवासासाठी नेमका किती खर्च झाला, तो खर्च कोणी केला आणि याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, रेल्वेगाडी चुकल्याने ऐनवेळी विमानाने प्रवास केल्याचा दावा तपास पथकाने केल्याची माहिती समोर आली आहे.

Vedh News