रुग्णवाहिका दीड तास ट्रॅफिकमध्ये, चिमुकल्याने आईच्या कुशीतच सोडला जीव ; अलिबाग मधील दुर्दैवी घटना

रुग्णवाहिका दीड तास ट्रॅफिकमध्ये, चिमुकल्याने आईच्या कुशीतच सोडला जीव ; अलिबाग मधील दुर्दैवी घटना 
Share

पुणे – ट्रॅफिक जॅम होणे ही नित्याचीच बाब झाल्यामुळे त्याला सर्वजण सरावले आहेत. पण या ट्रॅफिक जॅममध्ये रुग्णवाहिका तब्बल दीड तास अडकल्यामुळे उपचारासाठी निघालेल्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. अलिबाग तालुक्यातून ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. 

आरांश सुशील ठाकूर (वय १ वर्ष ८ महिने) असे या दुर्दैवी मृत बालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बामणगाव येथील नाक्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुशील ठाकूर यांचा आरांश हा धाकटा मुलगा होता. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरांश नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात खेळत होता. खेळता-खेळता त्याने अचानक एक फुगा गिळला आणि तो त्याच्या घशात अडकला. काही क्षणांतच आरांशचा श्वास गुदमरू लागला. घाबरलेल्या पालकांनी त्याला तातडीने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली.

रुग्णवाहिकेतून आरांशला रुग्णालयात नेत असताना बेलकडे-अलिबाग मार्गाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘माझ्या लेकराचा श्वास कोंडतोय, कोणीतरी रस्ता द्या हो…’ असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आरांशचे आई-वडील रुग्णवाहिकेतून करत होते. रुग्णवाहिकेचा सायरनही सतत वाजत होता, मात्र वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी कोणीही नव्हते.

तब्बल दीड तासानंतर रुग्णवाहिकेला पुढे जायला रस्ता मिळाला; परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुपारी चार वाजता रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून चिमुकल्या आरांशला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे अलिबाग परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेची सखोल वैद्यकीय आणि प्रशासकीय चौकशी करावी, तसेच संबंधित रस्ता ठेकेदार आणि प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Vedh News