राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी अंजली साळवे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी अंजली साळवे
Share

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्यमान रोहिणी खडसे यांच्या जागी अंजली साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत साळवे यांना पत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा माननीय डॉ. फौजिया खान यांच्या मान्यतेने, तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ॲड. अंजली साळवे-विठणकर यांची महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे ट्विट करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी, त्यांना संघटित करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच मोठा हातभार लागेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

ॲड. अंजली साळवे-विठणकर या नागपूर येथील नामांकित वकील, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकीय नेत्या आहेत. महिला व बालहक्क तसेच ओबीसी (OBC) समाजाच्या हक्कांसाठी त्या प्रामुख्याने कार्य करतात. चंद्रपूर येथील सरदार पटेल कॉलेज ऑफ लॉ मधून कायद्याची पदवी घेतली असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून कायद्यामध्ये पीएचडी संपादन केली आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशक आणि नागपूर येथील बाल कल्याण समितीच्या माजी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या कायदेशीर सल्लागार, समुपदेशक आणि विविध सरकारी व निमसरकारी संस्थांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.

Vedh News