कदमवाक वस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उध्वस्त ; गुन्हे शाखा आणि एफ डी ए ची संयुक्त कारवाई

कदमवाक वस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उध्वस्त ; गुन्हे शाखा आणि एफ डी ए ची संयुक्त कारवाई 
Share

लोणी काळभोर- लोणी काळभोर परिसरातील कदमवाकवस्ती (गायकवाड वस्ती) येथे अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त छापा टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू बनवणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त केला. रविवारी (दि.२२) रोजी पहाटे सुमारे सव्वा दोन वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ११ लाख १५ हजार ७०० ते ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २६) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे अधिकारी कर्मचारी पूर्व प्रादेशिक विभागात गस्त घालत असताना कदमवाकवस्ती येथील गायकवाड वस्ती परिसरात (इन्व्होरा इंग्लिश स्कूलसमोर) शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार परेश सावंत पोलीस अंमलदार सचिन कांबळे यांना मिळाली.

सुमारे महिनाभर पाळत ठेऊन खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संयुक्त कारवाई केली.

या कारवाईत एम’ ब्रँडची ४८४ पाकिटे (किंमत सुमारे ₹२,९०,४००) आणि १८ किलो सुगंधित चबाण्याचा तंबाखू (किंमत सुमारे ₹३,६०,०००) असा एकूण सुमारे ₹६,५०,४०० चा तंबाखू साठा तसेच तंबाखू पॅकिंग मशीन (₹१,००,०००), पॅकिंग साहित्य (₹१५,३००), गुलाब पाण्याचे नमुने आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी एक चारचाकी कार (मारुती सेलेरियो, अंदाजे ₹३,५०,०००) जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानावडे, सहाय्यक फौजदार ज्योतिबा कुरळे, पोलीस हवालदार परेश सावंत पोलीस अंमलदार सचिन कांबळे यांनी सहभाग घेतला.

Vedh News