व्हिसाची मुदत संपल्यानंतरही पुणे शहरांत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १९ परदेशी महिलांवर कारवाई

पुणे शहरांत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १९ परदेशी महिलांवर कारवाई.
पुणे – व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीररीत्या शहरात राहणाऱ्या १९ परदेशी महिलांना पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने शोधून काढले असून, त्यांना मायदेशी पाठवण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क, मांजरी आणि मुंढवा परिसरात पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने शोध मोहीम राबवली.
पुणे शहरात विविध देशांमधून आलेले काही परदेशी नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही मायदेशी परत न जाता वास्तव्य करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित नागरिकांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी कोरेगाव पार्क, मांजरी आणि मुंढवा परिसरात शोधमोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान कोरेगाव पार्क, मांजरी आणि मुंढवा परिसरातून एकूण १९ परदेशी महिला आढळून आल्या. संबंधित महिलांनी व्हिसाच्या अटी व नियमांचे उल्लंघन करून भारतात बेकायदेशीर वास्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लागू कायदे आणि नियमांनुसार हद्दपारीची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, संबंधित महिलांची राष्ट्रीयत्वनिहाय माहिती, त्यांच्या व्हिसाची मुदत आणि हद्दपारीच्या प्रक्रियेचा पुढील कालावधी प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजयकुमार दराडे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर आणि सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक सविता घनवट, युवराज हांडे, हर्षवर्धन गाडे, सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, मनोज बरुरे, संदीप खेडकर यांच्यासह विशेष शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.







