आजारावर मात करत ८६ वर्षीय शरद पवार ओतूर येथील जाहीर कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी सज्ज

आजारावर मात करत ८६ वर्षीय शरद पवार ओतूर येथील जाहीर कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी सज्ज 
Share

ओतूर – महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ओतूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनातून ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजारावर मात करून ८६ वर्षीय शरद पवार पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

​शनिवारी ओतूर येथे पार पडणाऱ्या या राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज असणार आहेत. या अधिवेशनाच्या निमित्ताने शरद पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे तीनही प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. उपचारानंतर शरद पवार यांची ही पहिलीच मोठी जाहीर उपस्थिती असून, या तिन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

​या महिन्याच्या सुरुवातीला धाराशिव आणि सोलापूर येथील दुष्काळी दौऱ्यावर असताना शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी सर्वप्रथम पुणे येथील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढे अधिक उपचारांसाठी त्यांना मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. विशेष म्हणजे आजारपणाच्या आणि उपचारांच्या या संपूर्ण काळातही अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. उपचार पूर्ण झाल्यानंतरही शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील काही नेत्यांशी चर्चेची खलबते सुरूच ठेवली होती. आता प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते उद्या पुणे जिल्ह्यातील कार्यक्रमातून पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत.

​

Vedh News