एअर होस्टेस वर्षा तूरकर यांचा खून विवाहबाह्य प्रेमसंबंधातून ; सुपारी देऊन केली हत्या
पुणे – एअर हॉस्टेस वर्षा तुरकर हत्येचा उलगडा पोलिसांनी केला असून विवाहबाह्य प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका महिलेसहित चौघांना अटक करण्यात आली आहे.
मोना अग्रवाल (वय ४१), इमरान करीम शेख (वय २६), कुणाल श्यामलाल कुंभलकर (वय ३१), फिरोज खान पठाण (वय ३३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गोंदिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा धुरनलाल तुरकर (वय ३५) या मूळच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही गावच्या होत्या. त्या पुणे विमानतळावर एअर इंडियामध्ये कार्यरत होत्या. दिवाळीच्या सुट्टीसाठी माहेरी आल्या होत्या.
१४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांचा मित्र नितेश ऊर्फ नितीन अग्रवाल हा चारचाकी गाडी घेऊन त्यांना भेटण्यासाठी आला होता. दोघेही तिरोडा येथे फिरण्यासाठी गेले होते. परत येताना गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी परिसरातील शिवमंदिराजवळील निर्जन जंगलात त्यांनी गाडी थांबवली. यावेळी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी वर्षा यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यांच्या पोटावर आणि पाठीवर वार करण्यात आले.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला नितेशने अज्ञात लुटारूंनी हल्ला केल्याचा दावा केला होता. मात्र, वर्षा यांच्या अंगावरील सोन्याची साखळी आणि दागिने सुरक्षित असल्याने पोलिसांना लुटमारीच्या कथेबाबत संशय आला.
या हत्येचा तपास करण्यासाठी गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सहा विशेष पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळापासून तिरोडा, खैरलांजी, वाराशिवनी, बालाघाट आणि गोंदिया परिसरातील सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यावेळी नितेशच्या कारचा तीन तरुण दुचाकीवरून पाठलाग करत असल्याचे समोर आले.
तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी गोंदियातील मुर्री परिसरातून इमरान करीम शेख याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता हत्येमागील धक्कादायक कट उघड झाला. नितेश आणि वर्षा यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय नितेशची पत्नी मोना अग्रवाल हिला होता. याच संशयातून तिने वर्षा यांना संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने परिचयातील कुणाल श्यामलाल कुंभलकर याची मदत घेतली. कुणालने शाहरुख खान फिरोज खान पठाण याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वर्षा यांच्या हत्येसाठी तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी निश्चित करण्यात आली. शाहरुख पठाण याने ही हत्या घडवून आणण्यासाठी इमरान शेख, नलेन ऊर्फ नायला शेख, आणि क्रिश राऊत या तिघांना तयार केले होते.
नितेश ज्या कारमधून वर्षा यांच्यासोबत फिरत होता, ती कार त्याची पत्नी मोना हिच्या नावावर होती. या कारमध्ये टोयोटा आय-कनेक्ट (Toyota i-Connect) ही जीपीएस ट्रॅकिंग सुविधा होती. मोनाने या सुविधेचा आयडी आणि पासवर्ड हल्लेखोरांच्या मोबाईलमध्ये सक्रिय करून दिला होता. त्यामुळे हल्लेखोरांना वर्षा आणि नितेश यांची जंगलातील अचूक लोकेशन घरबसल्या समजत होते. नितेशची कार बोंडराणी येथील निर्जन जंगलात थांबताच त्यांनी तिथे पोहोचून वर्षा यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने हा हत्येचा कट रचण्यात आला होता.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलने संयुक्त कारवाई करत मुख्य सूत्रधार मोना अग्रवाल, मध्यस्थ कुणाल कुंभलकर, सुपारी घेणारा शाहरुख पठाण आणि हत्येत सहभागी इमरान शेख या चौघांना अटक केली आहे. त्यांना पुढील तपासासाठी दवनीवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर या हत्येत सहभागी असलेले नलेन शेख आणि क्रिश राऊत हे दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास दवनीवाडा पोलीस करत आहेत. विवाहबाह्य प्रेमसंबंधाच्या संशयातून पत्नीनेच 13 लाखांची सुपारी देऊन पतीच्या मैत्रिणीची हत्या घडवून आणल्याचा हा प्रकार उघड झाल्याने बालाघाट आणि गोंदिया जिल्ह्यांत मोठी खळबळ उडाली आहे.

