एकमेकांकडे बघितले म्हणून तरुणांच्या दोन गटामध्ये दगड विटानी जोरदार हाणामारी

एकमेकांकडे बघितले म्हणून तरुणांच्या दोन गटामध्ये दगड विटानी जोरदार हाणामारी 
Share

पुणे- केवळ एकमेकांकडे बघितले म्हणून दोन गटांतील तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर जोरदार राड्यात झाले. दोन्ही गटांच्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात जमाव जमवून एकमेकांवर दगडफेक करून लाथाबुक्क्यांसह जोरदार हाणामारी केली. ही घटना कात्रज-गुजरवाडी परिसरातील दत्तनगरमध्ये शनिवारी (दि.१४) रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांतील तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर जोरदार दगडफेक झाली.

अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे परिसरामध्ये एकच तारांबळ उडाली. रस्त्यावरून जाणारे सामान्य नागरिक तसेच स्थानिक रहिवासी प्रचंड भयभीत झाले होते. या तीव्र गोंधळात उपद्रवी तरुणांनी रस्त्यालगत उभ्या केलेल्या अनेक दुचाकींच्या गाड्यांची तोडफोड करत नुकसान केले.

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने अत्यंत वेगाने सूत्रे हलवत आणि प्रसंगावधान दाखवत परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुमीत केंजळे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आणि हिंसाचार करणाऱ्या तब्बल ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Vedh News