सणासुदीच्या मुहूर्तावर गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणारी टोळी गजाआड ; ६ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी- सणासुदीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत ज्वेलर्सच्या दुकानात हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सुमारे ६ लाख ३८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाकड येथील पी.एन.जी. ज्वेलर्समधील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
धनराज विजय परमार (वय ४८, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) आणि सुचित्रा किशोर साळुंखे (वय ५५, रा. शिंदेवस्ती, केशवनगर, पुणे) अशी अटक केल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर सायंकाळी भूमकर चौक, वाकड येथील पी.एन.जी. ज्वेलर्समध्ये ग्राहकांची गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत आरोपींनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे २९.८४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने चोरून नेले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७९/२०२६ दाखल करण्यात आला होता.
यापूर्वी १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर याच दुकानातून अशाच पद्धतीने १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ११.३७६ ग्रॅम वजनाचे शॉर्ट मंगळसूत्र चोरीला गेले होते. या प्रकरणीही वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, आरोपींचा ठोस सुगावा लागत नव्हता. त्यानंतर तपास पथकाने भूमकर चौकातील दुकानापासून कोंढवा आणि केशवनगरपर्यंतच्या मार्गावरील सरकारी तसेच खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज सलग तपासले. त्यातून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, आपल्या मागावर पोलीस असल्याची चाहूल लागताच दोघेही आरोपींनी परराज्यात जाऊन लपण्याच्या प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी आपला शोध सुरूच ठेवला होता. आरोपी महाराष्ट्रात परतल्याची गुप्त माहिती मिळताच सापळा रचून धनराज विजय परमार याला ११ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. परमार याला पोलिसी हिसका दाखवताच त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुचित्रा किशोर साळुंखे हिला १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.






