छेडछाडीला विरोध करताच तरुणीला लोकलमधून ढकलले ; चाकाखाली सापडून तरुणीने गमावला डावा हात

छेडछाडीला विरोध करताच तरुणीला लोकलमधून ढकलले ; चाकाखाली सापडून तरुणीने गमावला डावा हात
Share

मुंबई- छेडछाडीला विरोध केल्यामुळे एका २० वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत रेल्वेमार्गावर पडल्याने रेल्वेच्या चाकाखाली सापडून पीडित तरुणीला आपला डावा हात कोपऱ्यापासून गमवावा लागला. ही धक्कादायक घटना नायगाव रेल्वे स्थानकावर घडली.

सोफिया अस्लम खान (वय २०) असे पीडित तरुणीचे नाव आहे. ती बोरीवलीहून विरारच्या दिशेने लोकलने प्रवास करत होती. याप्रकरणी भाईंदर रेल्वे पोलिसांनी ५३ वर्षीय जितेंद्र हिरमुखे या आरोपीला अटक केली आहे. ही घटना ४ नोव्हेंबर २०२६ रोजी घडली. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, नायगाव स्थानकात लोकल आल्यानंतर आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. याला विरोध करत तरुणीने त्याला चप्पल मारली, त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाद सुरू असताना आरोपीने तिला दोन्ही हातांनी प्लॅटफॉर्मवरून खाली रेल्वे रुळांवर ढकलले. ती दोन डब्यांच्या मध्ये पडली. ती स्वतःला वाचवून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाली, ज्यामुळे तिचा डावा हात कोपरापासून कापला गेला. तसेच तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन १६ टाके पडले आहेत. भाईंदर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Vedh News