पिंपरी-चिंचवड शहरात आरक्षित भूखंड अतिक्रमणाच्या विळख्यात ; प्रशासनाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट, कुणी केले अतिक्रमण ?

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेला हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) आणि भूसंपादनातून मिळालेल्या २५ एकर क्षेत्रफळाच्या ६० भूखंडांवर अतिक्रमण झाल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, यापैकी ४२ जागा बांधकाम व्यावसायिक असलेल्या राजकीय नेत्यांकडूनच टीडीआर स्वरूपात महापालिकेला मिळाल्या होत्या आणि त्याच जागांवर पुन्हा अतिक्रमण झाल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या १,०४,९६४ चौरस मीटर (सुमारे २५ एकर) जागेवर अनधिकृत ताबा मिळवण्यात आला असून मोकळे भूखंड विकसित न झाल्यामुळे तिथे व्यावसायिक शेड, पार्किंग आणि पक्की बांधकामे उभारली गेली आहेत. हे भूखंड उद्याने, क्रीडांगणे, शाळा, दवाखाने, स्मशानभूमी, बस स्थानक, पाण्याची टाकी आणि बेघरांसाठी घरे यांसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी संपादित करण्यात आले होते. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे आदेश दिले होते.
या सर्वेक्षणात समाविष्ट गावांमधील मोशीमध्ये सर्वाधिक १६ भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. त्याखालोखाल चोविसावाडीत १२, सांगवीत ११, रावेतमध्ये ८ आणि भोसरीमध्ये ३ भूखंडांवर अतिक्रमण आढळले आहे. चिखली आणि डुडुळगावमध्ये प्रत्येकी २, तर पिंपळे गुरव, किवळे, तळवडे, चऱ्होली, बोपखेल आणि आकुर्डीमध्ये प्रत्येकी १ भूखंड बाधित झाला आहे.
यापैकी ६० ते ६५ टक्के जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत असले, तरी उर्वरित अतिक्रमणांचे काय होणार आणि नागरिकांना आश्वासित सुविधा कधी मिळणार, असे प्रश्न अजूनही कायम आहेत. मोकळ्या केलेल्या भूखंडांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून उद्यान विभागाला कुंपण घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.






