संगमनेर येथील भारत हायस्कूलमधील लाचखोरी प्रकरणी संस्था अध्यक्षांच्या पुण्यातील घरावर एसीबीचा छापा
पुणे- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ संचलित भारत हायस्कूलमधील लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) प्रकाश चांदमल बोरा यांच्या पुण्यातील घरावर छापा टाकला आहे. या झडतीदरम्यान त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात मालमत्ता आढळून आल्याचे बोलले जात आहे.
प्रकाश चांदमल बोरा हे घारगाव येथील रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत. शाळेतील एका महिला शिक्षिकेचा एकस्तर वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापक संजय दगडू राणे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नाशिक एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी मुख्याध्यापकांच्या दालनातच ही रक्कम स्वीकारताना राणे यांना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी घारगाव पोलिसांत मुख्याध्यापकांसह संस्था अध्यक्षांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान संबंधित शाळेच्या शिक्षकांच्या मासिक वेतनातून दरमहा १० टक्के रक्कम आणि बदल्यांमध्ये लाखो रुपये घेतले जात असल्याचा गंभीर आरोप काही शिक्षकांनी केला आहे. या आर्थिक व्यवहारांचे मूळ शोधण्यासाठी आणि भ्रष्टाचाराची व्याप्ती तपासण्यासाठी पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंकज पळशीकर यांच्या पथकाने संगमनेर परिसरात ठाण मांडून ही शोधमोहीम राबवली आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
