पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय ; पुणे महापालिका उभारणार ‘पाताळ लोक’ भुयारी मार्ग
पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पुणे महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘पाताळ लोक’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यास मंजुरी दिली आहे. या अंतर्गत भोसरी ते उंड्री आणि भूगाव/रामनदी ते एरंडवणे/राजाराम पूल असे दोन भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत.
यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास तसेच त्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
पुणे शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी ही पुणेकरांसाठी जीवघेणी समस्या बनली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून हा भूमिगत द्रुतगती मार्ग तयार केला जात आहे
या प्रकल्पांतर्गत शहरात प्रमुख बोगदे तयार केले जाणार आहेत, ज्यात प्रामुख्याने भोसरी ते उंड्री (२३ किमी) आणि भूगाव/रामनदी ते एरंडवणे/राजाराम पूल (८ किमी) अशा ३१ किलोमीटरचे दोन भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत. याशिवाय भविष्यात हा भुयारी विस्तार ५४ ते ५६ किमीपर्यंत नेण्याचीही योजना आहे.
भोसरी ते उंड्री (२३ किमी) या सर्वाधिक लांबीच्या भुयारी मार्गाद्वारे भोसरी, संगमवाडी, धोबीघाट, पुणे कॅन्टोन्मेंट, कोंढवा आणि उंड्री हे भाग जोडले जाणार आहेत. ८ किमी च्या भूगाव/रामनदी ते एरंडवणे मार्गद्वारे राम नदी, डुक्कर खिंड आणि डीपी रोड हे भाग जोडले जाणार आहेत.
