वंचितांच्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्का साठी “खर्डा भाकरी” आंदोलनाला भापकरांचा जाहीर पाठिंबा !

वंचितांच्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्का साठी “खर्डा भाकरी” आंदोलनाला भापकरांचा जाहीर पाठिंबा !
Share

पुणे- ऐन दिवाळीत राज्यातील शेतकऱ्याला भीषण दुष्काळात वाऱ्यावर सोडल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काळी दिवाळी साजरी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “खर्डा भाकर”आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच रस्त्यावर चूल मांडून भाकरी, खर्डा बनवून शेतकऱ्यांसोबत जेवण करून आंदोलन केले. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पाठिंबा देत आंदोलनामध्ये उपस्थिती दर्शवली.

या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देताना याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षीचा ओला दुष्काळ आणि यावर्षीचा सुपर अलनिनोमुळे पावसाने मारलेली दडी त्यामुळे खरीप व रब्बी दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांचे कधीही भरून निघणार नाही एवढे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने राजा उदार झाला,हाती भोपळा दिला! या म्हणी प्रमाणे शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर पाच हजार रुपये मदत दिली आहे. या मदतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली असताना नामदार गिरीश महाजन यांनी सरकारने दिलेली पाच हजाराची मदत जर शेतकऱ्यांना पटत नसेल तर ती रक्कम परत करावी असे संतापजनक वक्तव्य करून बळीराजाची चेष्टा केली.

कर्जमाफीचा लाभ अनेक शेतकऱ्यांना दिलेला नाही, सक्तीने कर्ज वसुली केली जात असून शेतकऱ्यांची घरे सील केली जात आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा फराळ करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोल्यातील जाहीर कार्यक्रमात या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आमदार,खासदार, मंत्री मुख्यमंत्री यांच्या घरासमोर जाऊन बसावे व तुम्हीच पाणीही द्या व जेवणही द्या अशी भूमिका घेऊन बेमुदत आंदोलन करावे आवाहन केले होते. त्यांच्या या भूमिकेचे मी समर्थन केले. सरकारच्या व संवेदनशीलतेचा जाहीर निषेध करत आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व राज्यात वंचितच्यावतीने बळीराजाच्या बाबत होणाऱ्या या विधायक व शेतकरी हिताच्या आंदोलनाला पिंपरी चिंचवड शहरातील जन चळवळी व शेतकरी संघटना यांच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे असे भापकर यांनी म्हटले आहे.

Vedh News