दीड वर्षांपासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील दोन आरोपींना बेड्या, ग्रामीण पोलिसांची कारवाई

दीड वर्षांपासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील दोन आरोपींना बेड्या, ग्रामीण पोलिसांची कारवाई
Share

पुणे- दीड वर्षांपासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील दोन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. खेड सिटी एमआयडीसी परिसरातून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मयूर हजारे (रा. कनेरसर, ता. खेड, जि. पुणे) आणि गणेश गोरडे (रा. गोसासी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात हे आरोपी गेल्या दीड वर्षांपासून फरार होते. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट आणि मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्याकडून सातत्याने त्यांचा शोध सुरू होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत सदर आरोपींबाबत माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ नियोजन करून शोधमोहीम राबवून वरील दोन्ही आरोपींना खेड सिटी एमआयडीसी परिसरातून पकडण्यात पथकाला यश आले आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींना खेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबळे, पोलीस हवालदार संदीप फड, स्वप्नील गाढवे, हनुमंत ढोबळे यांनी काम केले.

Vedh News