महापालिकेच्या पॅनलवर राहून पालिकेच्या विरोधात खटले लढवणाऱ्या वकिलांवर कारवाई होणार ; स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांचा इशारा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून नियमित मानधन घेतल्यानंतरही जे वकील महापालिकेच्या विरोधात खटले लढवत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांना दिलेले मानधन परत घेतले जाणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महापालिकेच्या पॅनेलवर नियुक्त केलेल्या वकिलांनी आतापर्यंत महापालिकेच्या बाजूने किती खटले लढवले आणि त्यापैकी किती खटले यशस्वीरीत्या जिंकले, याचा सविस्तर लेखाजोखा प्रशासनाकडून मागवण्यात आला आहे. जोपर्यंत या वकिलांच्या कामगिरीची आणि केस लढवण्याच्या भूमिकेची संपूर्ण माहिती समोर येत नाही, तोपर्यंत मानधनाचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला असल्याचे अभिषेक बारणे यांनी सांगितले.
जे वकील महापालिकेकडून मानधन घेत असतानाही आमच्याच विरोधात खटले लढवत आहेत, त्यांना दिलेली रक्कम परत मिळवण्याची प्रक्रिया केली जाईल. जोपर्यंत यासंदर्भातील सर्व सविस्तर माहिती समोर येत नाही, तोपर्यंत हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला असून, यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अभिषेक बारणे यांनी व्यक्त केली.






