पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ८००० रुपये दिवाळी भेट? सावधान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ८००० रुपये दिवाळी भेट? सावधान! 
Share

पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सोशल मीडियावर प्रत्येक नागरिकाला ८,००० रुपयांची दिवाळी भेट किंवा बोनस मिळणार असल्याचा दावा करणारा मेसेज तुम्हाला आलाय का? मग सावध व्हा! हा मेसेज म्हणजे सायबर चोरट्यानी टाकलेले जाळे असून कोणतीही अनोळखी लिंक आली तर क्लिक करू नका. अन्यथा तुमचे बँक खाते क्षणार्धात रिकामे होऊ शकते असा इशारा पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिला आहे. 

सध्या व्हाट्सअपवर मेसेज फिरत असून पंतप्रधान यांचा फोटो वापरून ‘रोख अनुदान मंजूर’झाल्याचा बनाव करून लिंकच्या माध्यमातून हुबेहूब सरकारी वाटणाऱ्या बनावट पेजवर नेले जाते. तिथे तुमच्याकडून तुमचा आधार क्रमांक, बँकेचे डिटेल्स, पिन क्रमांक घेतला जातो. OTP विचारून तुमचे बँक खाते रिकामे करण्याचा नवा फंडा सायबर चोरट्याकडून वापरला जात आहे.

हा मेसेज पूर्णपणे खोटा आणि फसवणूक करणारा असून केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना किंवा दिवाळी बोनस जाहीर केलेला नाही. या मेसेजमध्ये दिलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करून लोकांची वैयक्तिक माहिती, बँक तपशील आणि OTP चोरून फसवणूक केली जात आहे.

अशा कोणत्याही खोट्या किंवा अज्ञाताकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका आणि ही माहिती पुढे पाठवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Vedh News