पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या बंगल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा राडा ; कार बंगल्यात घुसवण्याचा प्रयत्न

पुणे- सध्या वेगवेगळ्या वादग्रस्त प्रकरणामुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मालिन होताना दिसून आली आहे. त्यातच आता एका नव्या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे पोलीस चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मनमानी कारभार आणि त्रासाला कंटाळून दारूच्या नशेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपली कार थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अधिकृत निवासस्थानी घुसवण्याचा प्रयत्न करून प्रचंड गोंधळ घातला. हा प्रकार काल, मंगळवारी (दि. ३) संध्याकाळी घडला.
अमोल भिसे असे गोंधळ घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अमोल भिसे हे पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते.
प्राथमिक माहितीनुसार, अमोल भिसे याला यापूर्वी काही कारणांवरून सेवेतून निलंबित करण्यात आले होते. कारवाईनंतर त्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते. काल पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. भिसे यांना पुण्यातील एका पोलीस स्टेशनला बदली हवी होती. त्यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र बदली न झाल्याने चिडून दारूच्या नशेत त्याने थेट पोलीस आयुक्तांचा बंगला गाठला आणि जोरदार राडा केला.
सुमारे अर्धा तास त्याने तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे. बदलीच्या कारणावरून आलेल्या रागातून या कॉन्स्टेबलने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून संबंधित कर्मचाऱ्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या पोलीस प्रमुखांच्या बंगल्यावरच एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट आत शिरून अर्धा तास शिवीगाळ आणि गोंधळ घातल्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली. मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखून भिसे यांना तातडीने ताब्यात घेतले.






