पोलिसांचा सिनेस्टाइल थरारक पाठलाग ! कोथरूडमधून अपहरण झालेल्या व्यावसायिकाची सुखरूप सुटका

पोलिसांचा सिनेस्टाइल थरारक पाठलाग ! कोथरूडमधून अपहरण झालेल्या व्यावसायिकाची सुखरूप सुटका
Share

पुणे- सात लाख रुपयांच्या कर्जाच्या वादातून एका ४३ वर्षीय व्यावसायिकाचे चार जणांनी अपहरण केले मात्र पोलिसांनी कोथरूड ते नवी मुंबई सिने स्टाइल थरारक पाठलाग करून एका आरोपीला ताब्यात घेऊन अपहृत व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली. मात्र अटक केलेल्या आरोपीचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.

केदार जयंत वांगीकर (वय ४३, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे अपहरण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तर समीर गुलाब शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, वांगीकर यांनी त्यांच्या ओळखीच्या दोन मित्रांना आरोपीकडून सात लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी मध्यस्थी केली होती. मात्र, संबंधितांनी वेळेत कर्जाची परतफेड केली नाही. याच वादातून आरोपी समीर गुलाब शेख याने वांगीकर यांना जीवे मारण्याची धमकी देत अपहरण करण्याचा प्लॅन आखला.

२८ ऑक्टोबर २०२६ रोजी कोथरूड येथील दिपाश्री बंगल्याजवळ चार अनोळखी व्यक्तींनी केदार वांगीकर यांना धक्काबुक्की करत स्कॉर्पिओ गाडीत जबरदस्तीने बसवून नेले. याबाबत त्यांचे मित्र विनय प्रकाश पावटेकर यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलीस ठाण्याचे मार्शल कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी चव्हाण आणि लोंढे यांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पोलीस पथकही आरोपींच्या मागावर रवाना झाले.

आरोपींची स्कॉर्पिओ कर्वे रोड, चांदणी चौकमार्गे मुंबईच्या दिशेने जात असल्याचे समजताच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, रायगड, नवी मुंबई आणि महामार्ग पोलिसांना सतर्क करण्यात आले. खालापूर परिसरात संशयित स्कॉर्पिओ दिसताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. आरोपींनी पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत टोलनाक्याचा अडथळा तोडून भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने पलायन केले.

मात्र, पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला. अखेर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिटजवळ वाहतूक रोखून संशयित वाहनाची कोंडी करण्यात आली. पोलिसांनी पुढून आणि मागून घेराव घालत स्कॉर्पिओ अडवली. यावेळी एका आरोपीला ताब्यात घेऊन वांगीकर यांची सुखरूप सुटका करण्यात आली. अन्य तीन आरोपी महामार्गावरच वाहनातून उतरून पसार झाल्याची माहिती अटक आरोपीने पोलिसांना दिली.

याप्रकरणी वांगीकर यांच्या फिर्यादीवरून अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली असून, फरार तीन आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल माने करत आहेत.

सदरची कामगिरी सागर कवडे, सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शना खाली अलंकार पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सपोफौज तळोले, पोलीस हवालदार शेळके, यादव, सोनवणे, पोलीस शिपाई गोणारकर, विशाल मोरे, लोंढे, चव्हाण यांनी कौशल्याने तपास केला.

Vedh News