अप्पूघर येथील वृक्षतोड प्रकरणी कारवाईची मागणी, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचे आयुक्तांना पत्र

अप्पूघर येथील वृक्षतोड प्रकरणी कारवाईची मागणी, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचे आयुक्तांना पत्र
Share

पिंपरी – निगडी येथील महानगरपालिकेच्या अप्पूघरमध्ये ४९ झाडांची कत्तल झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे आणि कारवाईत दप्तर दिरंगाई करणा-या अधिकारी, कर्मचा-यांविरुध्द कधी कारवाई होणार असा सवाल पर्यावरण प्रेमींकडून विचारला जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे.

या पत्रात राहुल कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, निगडी दुर्गा टेकडी या निसर्गरम्य ठिकाणाच्या पायथ्याला अप्पु घर हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीचे आहे. हे चालवण्यासाठी आणि देखभालीसाठी पुष्पक अम्युझमेंट या संस्थेला दिलेले आहे. या संस्थेला महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून केवळ १३ झाडांच्या फांद्या छाटण्याची अधिकृत परवानगी दिली होती. 

तसे असताना या संस्थेने परवानगीचा गैरफायदा घेत छाटणी करण्याऐवजी ४९ डेरेदार आणि मोठी झाडे जमिनीच्या बुंध्यापासून कापून पूर्णपणे नष्ट केली. ही बाब अतिशय गंभीर असून या प्रकरणी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ४९ झाडे मुळासकट कापली, असा अहवाल दिल्याचे समजले. त्यानंतर देखील उद्यान विभागाने संबधित संस्थेला फक्त नोटीस बजावली आहे. अद्याप कोणतीही कारवाई या एजन्सीवर केलेली नाही.

या संपूर्ण प्रकरणात झाडांची कत्तल संबधित विभागातील अधिकारी व कर्मचा-यांच्या आशिर्वादाने झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे ४९ झाडांची कत्तल केल्याप्रकरणी तातडीने संबधित संस्थेविरुध्द गुन्हा दाखल करून नियमाधीन कारवाई करावी आणि त्यांना पाठिशी घालणा-या प्रशासनातील अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.

Vedh News