सिग्नलची पर्वा न करता पीएमपीएमएल चालकाने बस नेली थेट ससूनच्या दारात , नेमके काय घडले ?

सिग्नलची पर्वा न करता पीएमपीएमएल चालकाने बस नेली थेट ससूनच्या दारात , नेमके काय घडले ?
Share

पुणे- पीएमपीएमएल चालकाच्या प्रसंगावधानामुळे एका १७ वर्षांच्या तरुणीचा जीव वाचला आहे. ड्रायव्हर राजेंद्र निकम आणि कंडक्टर गोरखनाथ चव्हाण यांनी ठरलेला मार्ग सोडून बस थेट ससून रुग्णालयात नेल्यामुळे या मुलीला वेळेवर उपचार मिळाले. हे घटना घडली गुरुवारी दि.२९ रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास १७ वर्षांची एक तरुणी तिच्या आई-वडील आणि लहान भावासोबत पीएमपीएमएल बसने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान अचानक ती मुलगी चक्कर येऊन खाली कोसळली व बेशुद्ध पडली. मुलीला बेशुद्धावस्थेत पाहून तिच्या कुटुंबीयांची धावपळ उडाली. ‘माझ्या बहिणीला काय झालंय?’ असा आक्रोश करत तिच्या लहान भावाने कंडक्टर गोरखनाथ चव्हाण यांच्याकडे धाव घेतली आणि परिस्थिती सांगितली.

प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच कंडक्टर चव्हाण यांनी तात्काळ ड्रायव्हर राजेंद्र निकम यांना माहिती दिली. ड्रायव्हर निकम यांनी आरशात पाहिले असता मुलीची तब्येत अतिशय चिंताजनक दिसत होती आणि तिचे कुटुंब प्रचंड घाबरले होते. अशा अत्यंत ताणतणावाच्या प्रसंगी ड्रायव्हर निकम यांनी प्रसंगावधान राखत शांतपणे मोठा निर्णय घेतला. त्यांनी कोणताही थांबा किंवा सिग्नलची पर्वा न करता ठरलेला मार्ग सोडून बस थेट ससून हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागाच्या दिशेने सुसाट पळवली.

काही वेळातच बस सुसाट वेगाने ससून रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या दारात येऊन थांबली. बस थांबताच कंडक्टर चव्हाण यांनी तत्परता दाखवत व्हीलचेअर आणली आणि बेशुद्ध तरुणीला आत नेले. ससूनच्या डॉक्टरांनीही क्षणाचाही विलंब न करता इमर्जन्सी ट्रिटमेंट सुरू करून मुलीला ऑक्सिजन लावला. थोड्याच वेळात मुलीची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Vedh News