व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या दोघांना अटक, स्वारगेट पोलिसांची कारवाई

व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या दोघांना अटक, स्वारगेट पोलिसांची कारवाई
Share

पुणे – व्यावसायिकाची पैशांची बॅग हिसकावून पाच लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. या कारवाईत पोलिसांनी २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

२३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास गोळीबार मैदान परिसरातील गोल्डवाला भवन, सॅलिसबरी पार्क येथे ही घटना घडली होती. तीन अनोळखी व्यक्तींनी व्यावसायिकाच्या बॅगेतील पाच लाख रुपये चोरल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान यश सोनवणे (वय २५) आणि निहाल नवनाथ अडांगळे (वय २९) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीसांनी दिली.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने, कपडे, मोबाइल तसेच चोरीच्या पैशातून खरेदी केलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये एक कार, बुलेट दुचाकी, अ‍ॅपल कंपनीचे १८ प्रो मोबाइल, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि सहा लाख ५० हजार रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Vedh News