नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे निधन; वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा

पुणे- पुण्यातील ज्येष्ठ आणि नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. हिरेमठ मेंदूतील गंभीर आजाराशी प्रदीर्घ काळापासून झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे पुण्यासह संपूर्ण देशातील वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. हृदयविकार उपचारांचा गाढा वैद्यकीय अनुभव असलेला हृदयरोगतज्ञ हरपल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी लीना हिरेमठ आणि परिवार आहे.
डॉ. हिरेमठ यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन ट्युमर चे निदान झाले होते व दोनेक वर्षांपासून ते आजारी होते. इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. हिरेमठ यांनी चार दशकांहून अधिक काळ हृदयरोग निदान आणि उपचार केले. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीमधील त्यांचा अनुभव, तसेच हृदयविकारांबाबत जनजागृती करण्यासाठी केलेले प्रयत्न यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांची एक ओळख आहे.
पुण्यातील पहिली एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया १९८९ मध्ये त्यांनीच यशस्वीरीत्या केली होती. ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवा दिली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ४०,००० पेक्षा जास्त अँजिओप्लास्टी आणि १ लाखांहून अधिक अँजिओग्राफी शस्त्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. रुग्णांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. हृदयविकाराच्या झटक्यावरील आधुनिक उपचार पद्धती लोकप्रिय करण्यात आणि या आजाराबद्दल समाजात जनजागृती करण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.
डॉ. हिरेमठ यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस, एमडी आणि कार्डिऑलॉजीमधील डीएम ही पदव्युत्तर पात्रता प्राप्त केली. १९८२ मध्ये पुण्यातील जोशी हॉस्पिटलमधून त्यांच्या हृदयरोग उपचार क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी रुबी हॉल क्लिनिकसह पुण्यातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये काम केले. रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डिॲक कॅथलॅबचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.






