एमबीए साठी लंडनला गेली छत्रपती संभाजीनगरची तरुणी ; आणि मृतदेह आढळला पिंपरी-चिंचवड मधील एका फ्लॅटमध्ये

पुणे – लंडन येथे एमबीएच्या शिक्षणासाठी गेलेल्या ३४ वर्षीय मुलीसोबत पालकांचा संपर्क तुटला, ती बेपत्ता झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मुलीच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे उस्मानपुरा पोलीस पोहोचले पिंपरी-चिंचवड येथील शिरगाव मधील एका इमारतीत. या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यू प्रकरणी पिंपरी चिंचवडमधील शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मृत तरुणी २०२५ च्या जुलैमध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली होती. २३ ऑक्टोबरला तिच्या आईशी तिचे बोलणे झाले होते. तिची मुलाखत असल्याचे सांगून तिचे घाईघाईने फोन ठेवला होता. २४ ऑक्टोबरला पुन्हा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचा संपर्क झाला नाही.
मुलीशी संपर्क होत नसल्याने, तिच्या पालकांनी तिच्या मैत्रिणीशी संपर्क केला. मुलगी आणि आपला २२ ऑक्टोबरला मेसेजद्वारे संपर्क झाला होता. त्यानंतर तिच्याशी बोलणे झाले नाही असे मैत्रिणीने सांगितले. तिच्याशी संपर्क होत नसल्याने पालकांनी मैत्रिणीला विनंती करुन लंडन पोलिसांकडे तक्रार देण्याबाबत विनंती केली. लंडन पोलिसांनी तपास करुन मुलीने ऑगस्ट अखेरीस लंडन सोडल्याची माहिती मैत्रिणीला दिली. यावरून तिच्या पालकांनी उच्चायुक्तांकडे तक्रार केली.
मुलीने लंडन सोडले. तिचा फोनही लागत नाही. यामुळे पालकांनी तिच्या बँक खात्यातील व्यवहाराची माहिती घेतली असता, तिच्या खात्यावरून झोमॅटो, ब्लिंकीट, स्विगी, बुक माय शो, बुक माय ट्रीप, व्हीएफएस वरुन ऑर्डर दिल्याचे सांगितले. ब्लिंकीटवरुन उस्मानपुरा भागातही ऑर्डर मागवल्यावरुन पालकांना संशय आला. मुलगी शहरात आली, मात्र आपल्याला भेटली नाही. यामुळे त्यांचा संशय वाढला आणि त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
पोलिसांनी केलेल्या तांत्रिक माहितीवरुन मुलीचे लोकेशन पिंपरी चिंचवड येथेआढळून आले. या माहितीवरुन पोलीस उपनिरीक्षक बोराडे, चालक विलास कराडे व अन्य कर्मचारी पिंपरी चिंचवड येथील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोंढा टॉवर्स येथे पोहोचले. पोलिसांनी मुलीच्या रूमचा दरवाजा ठोठावला परंतु आतून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे उस्मानपुरा पोलिसांनी शिरगाव पोलिसांची मदत घेत, रुममध्ये प्रवेश घेतला असता, तेव्हा मुलगी मृतावस्थेत सापडली. या प्रकरणात शिरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानपुरा पोलिसांनी सदर मुलीचे लोकेशन काढून तिच्यापर्यंत पोहोचल्याने मृत्यूची घटना समोर आली.






