वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने हत्या ; पुरंदर तालुक्यातील घटना

वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने हत्या ; पुरंदर तालुक्यातील घटना 
Share

सासवड – घरासमोरून जनावरे नेण्याच्या कारणावरून काही दिवसापूर्वी भावकीतील शेजाऱ्यांशी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून एका वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. पुरंदर तालुक्याच्या पानवडी गावात हा प्रकार घडला. 

रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) आणि मोहन बाबुराव धिवार (वय ८३) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी गणेश सुभाष धिवार, (वय २७, रा. पानवडी) याच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी अमर खरात ( वय ३४) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानवडी गावात आरोपी गणेश धिवार हा मयत मोहन धिवार यांच्या घराशेजारीच राहत असून त्यांच्यात काही दिवसापासून किरकोळ कारणावरून वाद होते. त्यातच फिर्यादीच्या दारासमोरून गायी व बैल नेत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरूनच २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान फिर्यादी अश्विनी खरात यांचे आई वडील रत्नमाला धिवार आणि मोहन धिवार आपल्या घराकडे निघालेले असताना घराच्या अंगणात आधीच तयारीत असलेल्या आरोपीने

धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोघानाही जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. आणि त्यातच रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी गणेश धिवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापूर्वीच जेलमधून सुटून आला असून त्याला पुन्हा तडीपार केल्याने मूळ गावी राहायला आला होता. मात्र त्याच्या प्रवृत्तीने निष्पाप वृद्ध दाम्पत्याचा जीव घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

Vedh News