कोयत्याचा धाक दाखवून गॅरेज चालकाकडे खंडणी मागणाऱ्याला अटक

पुणे- कोयत्याच्या धाक दाखवून गॅरेज चालकाकडे १५ हजार रुपयांची मागणी करून दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली.
सुमीत उर्फ बंटी रणजीत गायकवाड ( २४, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका गॅरेज चालकाने नांदेड सिटी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाचे सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात गॅरेज आहे. शनिवारी (दि. २४) दुपारी पावणेचारच्या सुमारास गायकवाड तक्रारदार तरुणाच्या गॅरेजमध्ये आला. हातातील कोयत्याचा धाक दाखवून तक्रारदार तरुणाकडे १५ हजार रुपये देण्याची मागणी केली, तसेच त्याला दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागितला. तक्रारदार तरुणाने नकार दिल्यानंतर आरोपीने काेयता उगारुन दहशत माजविली.
घाबरलेल्या तक्रारदाराने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पसार झालेला आरोपी गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करत आहेत.






