हडपसरमध्ये ग्लायडिंग सेंटरच्या जागेत साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट

पुणे – हडपसर येथील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरच्या सुमारे २५० एकर परिसरात महाराष्ट्रातील पहिले अत्याधुनिक हेलिपोर्ट हवाई साहसी खेळासाठी सुविधा आणि भव्य एव्हीएशन गॅलरी साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा डी पी आर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
या जागेचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. हवाई वाहतूक हवाई पर्यटनाशी संबंधित उपक्रमाना चालना देण्याचा अभ्यास केला जात आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) ही जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (AAI) ९९ वर्षांच्या करारावर हस्तांतरित करण्यात आली आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नियोजन
जागतिक दर्जाची एव्हिएशन गॅलरी: हेलिपोर्टसोबतच येथे देशातील पहिली भव्य आणि परस्परसंवादी (Interactive) ‘एव्हिएशन गॅलरी’ विकसित केली जाणार आहे. या ठिकाणी विमान मॉडेल्स, फ्लाइट सिम्युलेटर आणि ऐतिहासिक प्रदर्शने पाहायला मिळतील. ग्लायडिंग उपक्रमांसोबतच पॅरामोटरिंगसारख्या थरारक हवाई खेळांसाठीही या जागेचा वापर केला जाणार आहे.
या हेलिपोर्टमध्ये प्रवाशांसाठी टर्मिनल, हेलिकॉप्टर पार्किंगसाठी हँगर, इंधन भरण्याची सोय, नाइट लँडिंगसाठी आधुनिक लायटिंग आणि स्वतंत्र एअर ट्रॅफिक कंट्रोल युनिट उभारले जाईल.
पुण्यात सध्या खासगी व व्यावसायिक मिळून सुमारे १८ ते २० हेलिकॉप्टर्सचा मोठा ताफा आहे. ही सर्व उड्डाणे लोहगाव विमानतळावरून होतात. हडपसरमध्ये स्वतंत्र हेलिपोर्ट सुरू झाल्यास लोहेगाव विमानतळावरील व्हीआयपी आणि व्यावसायिक हेलिकॉप्टरच्या हालचाली येथे वळवल्यामुळे मुख्य विमानतळावरील हवाई वाहतुकीचा ताण कमी होईल. वैद्यकीय आणीबाणी, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आणि व्यावसायिक दौऱ्यांसाठी जलद हवाई सेवा उपलब्ध होईल. हवाई पर्यटनाच्या माध्यमातून पुण्याच्या शिरपेचात नवा तुरा रोवला जाईल.
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डी पी आर पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी भूमिका स्पष्ट केली.
हडपसर येथील ‘ग्लायडिंग सेंटर’ हे पुणे विमानतळाच्या उड्डाण क्षेत्राच्या (फनेल झोन) बाहेर आहे. त्यामुळे साहसी खेळांच्या अथवा ग्लायडिंगचा उड्डाणांवर फारसा परिणाम होणार नाही. सध्या उड्डाण करणाऱ्या ग्लायडिंगसाठी सुमारे तीन हजार फूट उंचीवर जाण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच ज्या वेळी हेलिकॉप्टरची वाहतूक होते, तेव्हा ‘ग्लायडर’ हवाई नियंत्रण कक्षाकडून दिशा व उंचीबाबत सूचना दिल्या जातात.






