पुणे- शेल कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ४,४२७ कोटी ९२ लाख रुपयांहून अधिक रक्कम परदेशात पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी करचुकवेगिरी आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या आरोपांवरून पुण्यातील दोन चार्टर्ड अकाउंटंट्ससह काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून परदेशात पाठवलेल्या रकमेचे व्यवहार, संबंधित कंपन्या, Form 15CB प्रमाणपत्रे आणि या व्यवहारांशी संबंधित इतर बाबींचा तपास सुरू आहे.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश कुमार सुरेशचंद बगरेचा (३४, रा. आचलनगर, कोंढवा) आणि मोहित शिवकुमार तोडी (३३, रा. कोंढवा बुद्रुक) या दोन चार्टर्ड अकाउंटंट्सविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निगडी प्राधिकरणातील रहिवासी तन्मयी सुहास देसाई यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. रविवारी त्यांनी येवलेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परदेशात करण्यात आलेल्या रेमिटन्सशी संबंधित Form १५ सीबी प्रमाणपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर यामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत या तीन कंपन्यांशी संबंधित व्यवहारांमधून एकूण ४४२७.९२ कोटी रुपये परदेशात पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारांमध्ये करासंबंधीच्या नियमांचे पालन न करता करचुकवेगिरीचा प्रयत्न झाला होता का आणि त्यातून पैसा भारताच्या बाहेर पाठविण्यात आला आहे का, याबाबत तपास सुरू आहे.
या प्रकरणाच्या तपासात Form १५ सीबी हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. या फॉर्मचा वापर हा भारतातून परदेशातील व्यक्ती किंवा संस्थेला काही विशिष्ट प्रकारचे पेमेंट करताना त्यावर लागू होणाऱ्या कराची माहिती निश्चित करण्यासाठी केला जातो. फॉर्म १५ सीबी तयार करण्याचा अधिकार नसतानाही आरोपींनी तो तयार करून आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केल्याचा आरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा मिळवून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पुणे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये फसवणुकीशी संबंधित कलम ३१८(४), खोटे प्रमाणपत्र देण्याशी संबंधित कलम २३४, खोट्या पुराव्याशी संबंधित कलम २२९ आणि सामूहिक गुन्हेगारी जबाबदारीशी संबंधित कलम ३(५) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
