ब्रेकिंग न्यूज

शिक्षक-कर्मचाऱ्यांना ई-केवायसी ला ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, अन्यथा ऑक्टोबरचा पगार रोखणार

Share

पुणे – राज्यात शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्यास ५ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांचे पगार रोखण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत माहिती दिली. खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसह जि.प. शाळांतील शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही मुदत लागू आहे. क्षेत्रीय स्तरावर प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागण्याची शक्यता पाहून मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीची अनुदान मागणी मोघम स्वरूपात न करता संबंधित मंजुरी आदेशासह सादर करावी, असेही स्पष्ट निर्देश आहेत.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नवीन पोर्टल जाहीर

राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः आणि पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर पदांच्या भरती प्रक्रियेला आता ऑनलाइन स्वरूप देण्यात आले आहे. कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी स्वतंत्र ‘नॉन-टिचिंग वैयक्तिक मान्यता पोर्टल’ तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवरूनच नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता आणि शालार्थसंबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.

पोर्टलचे संकेतस्थळ लवकरच…

दिंनाक २८ मे २०२५पूर्वी झालेल्या नियुक्त्यांची वैयक्तिक मान्यता व शालार्थसंबंधी कार्यवाहीदेखील याच पोर्टलवरून करावी लागणार आहे. पोर्टलचे संकेतस्थळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून, संबंधित शाळांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती त्यावर सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.