ब्रेकिंग न्यूज

एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

Share

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी (ता. २७) सकाळी १० वाजता एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परवानगी नाकारली तरी आम्ही आंदोलन करणार अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी यापूर्वी २६ सप्टेंबरला आंदोलन करण्याची तयारी केली होती. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करू नये, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. त्यानंतर २७ सप्टेंबरला कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करणारच असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला होता. मात्र गणेशोत्सवाचं कारण देत पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. दरम्यान या आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहू शकतात, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

आंदोलनाला परवानगी मिळावी, यासाठी रोहित पवार हे विद्यार्थ्यांसह मंगळवारी पोलिस आयुक्तालयात आले होते. त्यांनी सह पोलिस आयुक्त संजय दराडे तसेच विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत अमृतकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, ” आयोगाचे अध्यक्ष बिमनवार यांचा राजीनामा, ऑनलाइनऐवजी ऑफलाइन परीक्षा घेणे, तसेच रखडलेली ७० हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी, अशा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांच्या असून, त्या संदर्भात हे आंदोलन असणार आहे. पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी 27 सप्टेंबरला कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करणारच असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे ”

विद्यार्थ्यांमध्ये कोणताही गट पडलेला नसून, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी गेलेल्या शिष्टमंडळात क्लासचालकांचा समावेश असल्याचा आरोपही केला. काही विद्यार्थी उपोषणाच्या तयारीत असून, आंदोलन किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. विद्यार्थ्यांच्या पाचही मागण्या मान्य झाल्यास मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करू, असेही पवार म्हणाले.