मुंबई- सर्वसामान्यपणे बँकांसाठी रविवारचा दिवस हा सुट्टीचा असतो. मात्र यावेळी २७ सप्टेंबर रोजी सुद्धा बँका सुरु राहणार आहेत. या महिन्यात २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत संभाव्य संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने येत्या रविवारी देखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपाच्या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ शकते, ती टाळण्यासाठी आता भारतीय रिझर्व्ह बँकेने २७ सप्टेंबर रोजी सर्व बँक शाखा, कार्यालये, एटीएम-लिंक्ड शाखा आणि करन्सी चेस्ट यांना पूर्णपणे कार्यान्वित करण्याची परवानगी दिली आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने २८ ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. २६ आणि २७ सप्टेंबर रोजी शनिवार व रविवारच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे नागरिकांच्या बँकिंग गरजा लक्षात घेऊन सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत. बँकिंग कामकाजाचा आठवडा हा पाच दिवसांचा करावा ही त्यांची मुख्य मागणी आहे. या संदर्भात सरकारची युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्स सोबत बैठक पार पडली, परंतु या बैठकीमध्ये कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. सरकारने जर आमच्या मागण्यांबाबत काही निर्णय घेतला तर आम्ही संप मागे घेऊ असे देखील युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने म्हटले आहे.
बँक ग्राहकांचे कल्याण आणि सुविधा ही सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. सरकार आणि बँक व्यवस्थापनाने युनियनला प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे आणि आवश्यक बँकिंग सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालू ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत.
