ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवड मधून २६ बांगलादेशी नागरिक हद्दपार तर देहूरोडमधून आणखी एक बांगलादेशी तरुणी ताब्यात

Share

पिंपरी- पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) बेकायदेशीरपणे शहरात राहणाऱ्या २९ बांग्लादेशी नागरिकांचा शोध घेतला. त्यातील २६ नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे. गुरुवारी (दि. १७) देहूरोड परिसरात आणखी एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्यासह आणखी दोघांना बांग्लादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त धीरज पाटील यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड एटीबीला गुरुवारी माहिती मिळाली की , देहूरोड परिसरात स्वर्ग लॉज मध्ये एक बांगलादेशी तरुणी राहत असून ती भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहे. त्यानुसार एटीबीने लॉजमध्ये शोध घेत तरुणीला ताब्यात घेतले.

तिची चौकशी केली असता तिने तिचे नाव तन्हा खातून असे सांगितले. तिच्याकडे असलेली कागदपत्रे बनावट होती. तिच्याबाबत अधिक चौकशी केली असता तिचे मूळ नाव फिहा मोहम्मद मुजिबूर रहमान (१९, बोयरा, जमालपूर, मदारगंज, बांगलादेश) असे असल्याचे निष्पन्न झाले. एक वर्षांपूर्वी फिहा हिने भारतात अनधिकृतपणे प्रवेश केला. ती तिच्या आई-वडिलांशी आयएमओ आणि व्हाट्स ऍप माध्यमातून संपर्क करत होती. पोलिसांनी तिच्या बांगलादेश मध्ये डिपोर्टेशन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

मे २०२५ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने विदेशी नागरिक भारतात अनधिकृतपणे वास्तव्य करताना आढळले तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करता त्यांना थेट त्यांच्या दिशेत पाठवून देण्याबाबतचे धोरण जाहीर केले. अशा नागरिकांवर गुन्हे दाखल केल्यास न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब होतो. तसेच काही बांगलादेशी नागरिक जामिनावर बाहेर येऊन पुन्हा बेपत्ता होत असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे अशा नागरिकांना थेट त्यांच्या देशात पाठवून दिले जात आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मे २०२५ पासून शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या २९ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला. त्यातील २६ नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले असून इतर तीन जणांना पाठवण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त धीरज पाटील यांनी सांगितले.