ब्रेकिंग न्यूज

येत्या ७ दिवसात जाहीर माफी मागा… ; आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांना सातिश सालियन यांची कायदेशीर नोटीस

Share

मुंबई- दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व आमदार आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. सात दिवसांत बिनशर्त जाहीर माफी मागण्याची दिशाचे वडील सातिश सालियन यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे. तसेच मानहानीप्रकरणी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख या दोघांकडे 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी देखील करण्यात आली आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून आता याला कायदेशीर वळण मिळाले आहे. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणातील आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचा आणि आपले चरित्रहनन केला जात असल्याचा दावा केला होता. हा दावा खोटा व आपली बदनामी करणारा असल्याचे सतीश सालियन यांनी म्हटले आहे.

सतीश सालियन यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याकडून तब्बल 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची (मानहानी) मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, दोन्ही नेत्यांनी मागितलेली ही बिनशर्त माफी सर्व प्रमुख वृत्तपत्रे, टीव्ही न्यूज चॅनेल्स आणि डिजिटल मीडिया माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी, अशी स्पष्ट अटही नोटीसमध्ये घालण्यात आली आहे.

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी सीबीआयने (CBI) यापूर्वीच तपास करून क्लीन चिट दिल्याचा दावा केला होता. मात्र, २ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई हायकोर्टात सीबीआयने यापूर्वी असा कोणताही तपास केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.