ब्रेकिंग न्यूज

पिंपरी चिंचवड महापालिका ; महापौरांकडून तहकूब सभा पुन्हा नव्याने महिनाभर तहकूब

Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा आज बुधवारी (दि. १७) महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र, गौरी-गणपती उत्सवामुळे भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक नगरसेवक सभेला अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे तहकूब सर्वसाधारण सभा महापौर रवी लांडगे यांनी पुढील महिन्यात १५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पुन्हा तहकूब केली.

सभेच्या प्रारंभी निगडी येथील मयत चिमुकली संस्कृती तसेच जुन्नरच्या नेत्या आशा बुचके, मावळचे माजी आमदार मदन बाफना, माजी नगरसेविका फुगे यांच्यासह शहरातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी भाजपचे सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा ठराव मांडला. यावेळी त्यांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या ठरावाला विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी अनुमोदन देत पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्याचा गौरव केला. भाऊसाहेब भोईर यांनी नगरसेवकांच्या उपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “आज मोठ्या व्यक्तीचा वाढदिवस आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात नगरसेवक उपस्थित नाहीत. कोरम पूर्ण असता तर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली असती,” असा टोला त्यांनी सभागृह नेते प्रशांत शितोळे यांना लगावला.

गौरी-गणपती उत्सवामुळे नगरसेवकांची उपस्थिती कमी असल्याचा मुद्दा सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी मांडला. त्यामुळे तहकूब सर्वसाधारण सभा पुढील महिन्यात १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी सभा १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केली.

सर्वसाधारण सभा पुन्हा महिनाभरासाठी तहकूब करण्यात आल्यामुळे विषयपत्रिकेवरील शहराच्या हिताचे निर्णय पुन्हा महिनाभर लांबणीवर पडले आहेत.