पुणे- पुणे फेस्टिव्हल २०२६ च्या निमित्ताने अलका चौकात ढोल-ताशांच्या गजरात आणि “पुणे फेस्टिव्हल”च्या बोधचिन्हाच्या भव्य रांगोळीच्या सादरीकरणात ‘मंगलाचरण सोहळा’ पार पडला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी आणि महापौर मंजुषा नागपुरे, तसेच पुणे फेस्टिवल २०२६ चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि जनरल सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू उपस्थित होते.
या सोहळ्यात शिवमुद्रा ढोल पथकाने स्थिर वादन सादर करत परिसर दणाणून सोडला. तर राष्ट्रीय कला अकादमी न्यासचे अमर लांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे फेस्टिव्हलचे बोधचिन्ह असलेली भव्य रांगोळी रेखाटून या सोहळ्याला रंगबिरंगी साज चढवला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी आणि महापौर मंजुषा नागपुरे, तसेच कृष्णकुमार गोयल आणि डॉ. सतीश देसाई यांनी फुगडीचा फेर धरला.
या वेळी मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा गणपती जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, मानाचा तिसरा गुरूजी तालीम गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आणि मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष महेश सुर्यवंशी, शारदा गजानन गणपती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात तसेच इतर मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
