पिंपरी- चालू आर्थिक वर्षासाठी (२०२६-२७) १,३०० कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र आणि मोकळ्या जागांच्या थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र वसुली पथकाची नियुक्ती केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली आहे. थकबाकीदारांना ३० सप्टेंबर पूर्वी नोटीस बजावून १ ऑक्टोबरपासून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरु केली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र आणि मोकळ्या जागांसहित ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. शहरातील १८ विभागीय करसंकलन कार्यालयाच्या हद्दीतील करवसुलीचा सांडभोर यांनी आढावा घेतला. बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र आणि मोकळ्या जागांच्या थकबाकी वसुलीला प्राधान्य देत स्वतंत्र पथके तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. देयके बजावूनही अद्याप कराचा भरणा न केलेल्या मालमत्तांची स्वतंत्रपणे नोंद घ्यावी. त्यांच्याशी संपर्क साधून कर भरण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, १ एप्रिल ते १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ५८४ कोटी ४९ लाख ४५ हजार २२८ रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन कर भरल्यास सामान्य करावर ४ टक्के सवलत मिळणार आहे. नागरिकांनी मुदतीपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांडभोर यांनी केले.
