पुणे- नजरचुकीने नो पार्किंगमध्ये कार उभ्या केलेल्या कार मालकाला १० हजार रुपये दंड लागेल अशी भीती घालून त्याच्याकडून ३ हजारांची खंडणी घेतल्या प्रकरणी ट्रॅफिक टोईंग व्हॅनवरील चालक व २ टोईंग कामगारांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील लेन नंबर ६ मध्ये २० जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली होती.
आकाश नवनाथ सावंत (वय २२, रा. स टा वाडी मळा, कोरेगाव पार्क), समीर अतिक अन्सारी (वय ३०, रा. प्रायव्हेट रोड) आणि शेख शौकत अतिक अन्सारी (वय ३०, रा. ताडीवाडा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अमोल आनंद भिलारे (वय ४६, रा. साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची गाडी नजर चुकीने नो पार्किंगमध्ये पार्क करुन गेले होते. टोईंग व्हॅनवरील दोन कामगार आणि चालक यांनी ही कार टोईंग करुन नेली होती. फिर्यादी यांची कार दीव दमण येथील आर टी ओ पासिंगची आहे. तिचे महाराष्ट्रात पासिंग करुन घेतली नाही व पीयुसी संपलेली असून ती काढलेली नाही, अशी कारणे सांगून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांना १० हजार रुपये दंडाची भीती घालून त्यांच्याकडून ३ हजार रुपये रोख खंडणी स्वरुपात घेतले. त्यांना कोणतीही पावती दिलेली नाही. याबाबत फिर्यादी यांनी अनेकदा पाठपुरावा केला.परंतु पावती देण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली.
टोईंग व्हॅनचालकांकडून असे प्रकार सर्रास सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे याबाबत तक्रार दिली होती. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी याचा शोध घेऊन तिघांना मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. फिर्यादी यांच्याबरोबर आणखी कोणाला यांनी लुटले आहे का याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत चव्हाण करीत आहेत.
