ब्रेकिंग न्यूज

पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Share

पुणे – एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी परांडा येथून पुण्यात आलेल्या तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. 

प्रथमेश दिलीप देशमुख असे या तरुणाचे नाव आहे.

प्रथमेश मागील दीड ते दोन वर्षांपासून पुण्यात राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. मात्र, काही काळापासून त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचं कर्ज होतं, अशी माहिती समोर आली आहे. आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कर्ज फेडणे आणि पुण्यातील राहण्याचा खर्च भागवणे त्याला कठीण जात होते, अशीही माहिती समोर आली आहे.

प्रथमेशने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक अडचणी आणि त्याने ज्या व्यक्तींकडून पैसे घेतले होते, त्यांच्या व्यवहारांचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी नारायण पेठ पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी पुण्यात एमपीएससी करणाऱ्या तरुणांनी आंदोलन करुन पेपर फुटीवरून सरकारला धारेवर धरले होते. अशातच प्रथमेशच्या आत्महत्येमुळे एमपीएससी करणाऱ्या तरुणांची दयनीय अवस्था अधोरेखित झाली आहे.