पुणे- पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटी संपवून निघालेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यावर चार जणांनी मिळून धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईलही पळवून नेला. या हल्ल्यात पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय बोंबाळे असे जखमी झालेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास अक्षय बोंबाळे हे आपले कामकाज आटोपून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरून पायी जात होते. त्यावेळी अक्षय यांची तोंडओळख असलेले विकी आणि रॉकी यांनी त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांसह अचानक बोंबाळे यांना रस्त्यात अडवले.
‘तू माझ्या आईला जाऊन मी गांजा आणि दारू पितो अशी खोटी चहाडी का सांगितलीस?’ असा जाब विकीने बोंबाळे यांना विचारला. यावरून आरोपींनी त्यांच्याशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा केवळ गैरसमज असल्याचे सांगण्याचा प्रयत्न बोंबाळे यांनी केला, मात्र आरोपींचा राग अनावर झाला होता.
‘तुला आता जिवंत सोडतच नाही,’ अशी धमकी देत दोन साथीदारांनी बोंबाळे यांचे हात-पाय घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर कसलाही विचार न करता विकीने स्वतःकडील चाकू काढून बोंबाळे यांच्या गळ्यावर चालवला, तर पाठोपाठ रॉकीने त्यांच्या छातीवर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बोंबाळे रक्ताच्या थारोळ्यात पडले. ते खाली कोसळताच आरोपींनी त्यांच्या अंगावरील सोन्याची साखळी आणि खिशातील मोबाईल हिसकावून घेतला व अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बोंबाळे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे समजते. या प्रकरणी विकी, रॉकी आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
