पिंपरी – जुनी सांगवी येथे दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी लावलेले हँगिंग साउंड (डीजे) आणि त्याचे लोखंडी स्टँड अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) रात्री पावणेअकरा वाजता घडली होती. या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी मंडळाचा अध्यक्ष, मंडप मालक आणि साउंड सिस्टिम मालकावर गुन्हा दाखल केला असून मंडप आणि साऊंड सिस्टिम मालकाला अटक करण्यात आली आहे.
मंडप आणि लोखंडी स्ट्रक्चर उभारणारे मेहबूब उर्फ सॅम रमजान शेख (वय २७), स्पीकर साऊंड सिस्टम उपलब्ध करून देणारे कुणाल अनिल भोगावडे (वय २९) या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर मंडळाच्या अध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी सांगवीतील विघ्नहर्ता दहीहंडी मंडळ येथे शुक्रवारी (दि. ४) रात्री पावणेअकरा वाजता सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४६) या महिलेचा दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी लावलेले हँगिंग साउंड (डीजे) आणि त्याचे लोखंडी स्टँड अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयत सलमा आणि त्यांचे पती सलाउद्दीन हे दहीहंडी पाहण्यासाठी विघ्नहर्ता दहीहंडी मंडळ येथे गेले होते. दहीहंडी संपल्यानंतर ते तेथून जात असताना हँगिंग साउंड आणि त्याचे लोखंडी स्टँड अचानक खाली पडला. तो नेमका सलमा यांच्या अंगावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने औंध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
