मुंबई – संपूर्ण राज्यात एफडीएकडून होत असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र याच कारवाईबद्दल एफ डी ए ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर पुण्यातील मिठाई दुकानाच्या प्रकरणात कोर्टाने सोमवारी एफडीएला पाच लाख रुपयांचा दंड लावून दणका दिला आहे.
याबाबतची हकीकत अशी की एफडीएने पुण्यातील गुरूनानक डेअरी अँड स्वीट्स या दुकानाची १३ जून रोजी तपासणी केल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने दुकानातील स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक स्वच्छतेबाबत आक्षेप नोंदवले आणि त्याच दिवशी दुकानाचा परवाना निलंबित केला. त्यानंतर दुकानाच्या मालकांनी एफडीए आयुक्तांकडे अपिल केले आणि नियमांचे पालन केल्याचा अहवाल दिला.
मात्र, तरीही परवाना पूर्ववत करण्यात आला नाही. या कारणास्तव दुकान मालकांनी हायकोर्टात याचिका केली होती. तसेच नियम पालनाचा अहवाल दिल्यानंतरही परवाना पूर्ववत केला नसल्याने आमचे साडेआठ लाखाहून अधिक उत्पन्न बुडाले असे म्हणणे दुकान मालकांच्यावतीने मांडण्यात आले.
त्यावर हायकोर्टाने निकाल देताना म्हटले की ‘नागरिकांच्या आरोग्य हितासाठी तुम्ही पुढाकार घेताय हा तुमचा (एफडीए) हेतू चांगला आहे. मात्र, तुमच्याकडून अतिरेकही होत आहे. पुन्हा केलेल्या तपासणीत ९८ टक्के नियमांचे पालन झाल्याचे आढळल्यानंतर तुमच्याकडून त्या दुकानाचा परवाना तातडीने पूर्ववत का केला गेला नाही? खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांचे परवाने त्यांच्याकडून नियम पालन झाल्याचे अहवाल आल्यानंतरही निलंबित ठेवण्याचे तुमचे धोरण विचित्र आणि विपरित परिणाम करणारे आहे’, असे निरीक्षण नोंदवून हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने एफडीए ला ५ लाखांचा दंड ठोठावला. दरम्यान संबंधित प्रकरणानंतर आता तुकाराम मुंढे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
