पुणे- पुणे पोलिसांनी शहरात १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. मात्र, या दरम्यान राहुल गांधींचा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सलग येणारे सण आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दीही होते. यातच अतिक्रमण हटवण्याची कारवाईसुद्धा केली जाणार आहे. अशावेळी गर्दी होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन जमावबंदी लागू करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात विद्यार्थ्यांसोबत छात्रो की गुंज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुणे पोलिसांकडून परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ऑगस्ट संपेपर्यंत पुण्यात जमावबंदी आदेश लागू असणार आहे. त्यामुळे काँग्रेसला अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करता येणार का? पुणे पोलिस काय निर्णय घेणार? हे महत्त्वाचं ठरणार आहे.
