बारामती- “विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या वास्तूमध्ये गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासह समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडवणारे प्रेरणास्थान उभारण्यात येणार आहे. या वास्तूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्याचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारलेल्या या वास्तूमध्ये विविध महापुरुषांचे फोटो लावण्यात येणार असून, त्यासाठी उत्तम कलाकारांकडून त्यांची चित्रे तयार करून घेण्यात आली आहेत. राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सयाजीराव गायकवाड, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि शारदाबाई पवार यांना या ठिकाणी प्रेरणास्थान म्हणून स्थान देण्यात येणार आहे.
या महापुरुषांनी समाजासाठी केलेले कार्य, त्यांचे विचार, कर्तृत्व आणि योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या संकल्पनेमागील उद्देश असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या जीवनकार्याची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापुरुषांचे विचार आणि त्यांचे समाजासाठीचे योगदान पुढील पिढीला समजावे, या उद्देशाने उभारण्यात येणारे हे प्रेरणास्थान महत्त्वाचे ठरणार आहे.
