ब्रेकिंग न्यूज

चोरीसाठी लकी शनिवार ! पुण्याहून मुंबईला जाऊन सोनसाखळी पळवणाऱ्या वृद्ध महिलेला अटक

Share

मुंबई -‘न कर्त्याचा वार शनिवार’ असे म्हणतात. ज्याला काम करण्याची इच्छा नसते तो नेहमी शनिवारचे निमित्त सांगून काम करण्याचे टाळत असतो. पण पुण्यातील एक आजी आपली हातसफाई करायला फक्त शनिवारचीच मुंबईला जायच्या. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि मंगळसूत्र लांबवणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

अनघा जोशी (वय ६५) असे या वृद्ध महिलेचे नाव असून तिला दादर स्थानकात रेल्वे पोलिसांनी रंगेहात पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अनघा जोशी यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता, तर पतीचा दारूच्या व्यसनामुळे मृत्यू झाला. घर चालवणे आणि रोजचा खर्च भागवणे कठीण झाल्यामुळे त्यांनी चोरी करण्यास सुरुवात केली.

मात्र, त्या या चोऱ्या फक्त महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारीच करीत असत. त्यासाठी त्या पुण्यातून मुंबईत चोरी करण्यासाठी येत असत. इतर दिवस आपल्यासाठी ‘लकी’ नाहीत, असा त्यांचा समज होता.

२ मे रोजी दादर रेल्वे स्थानकात बोरीवली लोकल पकडणाऱ्या एका ४४ वर्षीय महिला बँकरच्या गळ्यातील ६७,००० रुपयांची सोन्याची साखळी व पेंडंट हिसकावण्यात आले. यानंतर महिनाभरानंतर ६ जून रोजी दादर येथेच बोरीवली लोकलमध्ये चढताना एका फायनान्स एक्झिक्युटिव्ह महिला कर्मचाऱ्याचे ८९,००० रुपयांचे मंगळसूत्र आणि सोन्याची साखळी पळवण्यात आल्याची घटना घडली होती.

या दोन्ही तक्रारींनंतर पोलीस उपायुक्त सुनीता साळुंखे-ठाकरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दादर स्थानकातील CCTV फुटेज तपासले. दोन्ही घटनांच्या वेळी महिला डब्याजवळ एक वृद्ध महिला घुटमळताना पोलिसांना दिसली. संशय आल्यानंतर पोलिसांनी तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आणि तिसऱ्या महिला प्रवाशाला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात असताना तिला रंगेहात पकडले.

अनघा जोशी यांनी २० वर्षांपूर्वीही त्या अल्पकाळासाठी चेन स्नॅचिंगमध्ये सहभागी असल्याचे कबूल केले. त्यांनी मुंबईतून चोरलेले सोने पुण्यात नेऊन सराफांना विकले होते. पोलिसांनी पुण्यातील सराफांकडून चोरीचे दागिने जप्त केले असून, सध्या अनघा जोशी न्यायालयीन कोठडीत आहेत.