चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी १६ ऑगस्ट २०२६ रोजी चाकण येथे उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेतली. या बैठकीत ३१ ऑगस्ट पर्यंत चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.
चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या गंभीर समस्येने त्रस्त झालेल्या उद्योजकांनी येथून स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुमारे २० उद्योजकांनी टाळेबंदीची प्रक्रिया सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उद्या सामंत यांनी चाकणचा दौरा करून येथील उद्योजक आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्या सामंत यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व खड्डे आरएमसी सारखे अत्याधुनिक मटेरियल वापरून ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत बुजविण्याचे निर्देश दिले तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने शॉर्ट, मिड आणि लॉन्ग टर्म निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी २ ते ३ महत्त्वाचे पर्यायी रस्ते तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे, ज्यामुळे २५% पर्यंत वाहतूक कोंडी सुटू शकते असे सामंत म्हणाले.
समस्यांच्या जलद आणि कालबद्ध निवारणासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून एका नोडल ऑफिसरची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. चाकणमधून एकही उद्योग बाहेर जाणार नाही आणि कंपन्यांच्या स्थलांतराची चर्चा चुकीची असल्याचे सांगत सरकारकडून उद्योगस्नेही वातावरण राखण्याची ग्वाही दिली.
…..तर मी आत्महत्या करेन
उद्योगमंतीर उदय सामंत यांच्या चाकण एमआयडीसी दौऱ्याच्या वेळी एका स्थानिक शेतकऱ्याने उद्योगमंत्र्यांना गाठून आपला संताप व्यक्त केला. कारवाईच्या नावाखाली आमच्यावर दादागिरी केली जात असल्याचा आरोप त्या शेतकऱ्याने केला. आमचं हक्काचं घर जातंय.. अशीच दादागिरी चालली तर मी थेट आत्महत्या करेल असा इशारा शेतकऱ्याने दिला.
उद्योगाबाबत भगवी श्वेतपत्रिका काढणार
दावोस मध्ये किती कंपन्यांसोबत करार झाले, किती गुंतवणूक आली, याची भगवी श्वेतपत्रिका काढणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले. वेदांता फॉक्सन, एअर बस प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढली होती. पण त्यावर कुणीही चर्चा केली नाही असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
