ब्रेकिंग न्यूज

लवकरच पुणे शहरात दिसणार पीएमपीचे सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक बसथांबे 

Binai i
Share

पुणे – पीएमपी प्रशासनाने ‘बीओटी’ तत्त्वावर शहरातील बस थांब्यांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ६८५ थांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन आणि मोबाईल चार्जिंगसारख्या आधुनिक सुविधा मिळणार आहेत.

या कामासाठी पीएमपी प्रशासनाने क्लस्टर तयार केले असून शहराच्या वर्दळीचा भाग व प्रवासी संख्या जास्त असलेला भाग या क्लस्टरमध्ये निवडण्यात आला आहे. स्टेनलेस स्टीलच्या देखण्या संरचनेसह हे बस थांबे उभारले जाणार असून, यात पुण्यातील ३३९, तर पिंपरी-चिंचवडमधील ३४६ बस थांब्यांचा समावेश आहे.

पीएमपी प्रशासन दर वर्षाला किमान १ हजार आधुनिक बस थांबे बांधण्याचा विचार करत असून या थांब्याची जागा १५ वर्षाकरिता संबंधित ठेकेदाराला दिली जाईल. त्या बदल्यात त्यांच्याकडून थांब्यावर सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या आधुनिक थांब्यांच्या छतांवर सौर ऊर्जेचे पॅनल देखील लावले जाणार असून, यातून निर्माण विजेच्या माध्यमातून दिव्याची सोय करण्यात येणार आहे. हे थांबे पूर्णतः स्टेनलेस स्टीलचे असतील. एका थांब्यासाठी किमान चार लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

“पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अद्याप ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे तिथे जागेची निवड व अन्य प्रक्रिया थांबली आहे. ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय पिंपरी-चिंचवड मध्ये काम करता येणार नाही” अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी म्हटले आहे.